Raigad Fort Information in Marathi
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या महाराष्ट्राला महान असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.आपल्या महाराष्ट्रात खूप मोठी महान माणसं होऊन गेली त्यांपैकी एक आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत.त्यांचे नाव ऐकताच आपला ऊर अभिमानाने भरून येतो कारण आपला जन्म या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जन्मभूमीत आणि त्यांच्या कर्मभूमीत झाला आहे.ते होते म्हणून आपण आज सगळेजण गुण्यागोविंदाने राहत आहोत . त्यांनी अनेक लढाया लढल्या, अनेक किल्ले जिंकले आणि काही नवीन बांधले त्यामधील एक मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला आहे म्हणूनच मी या लेखात Raigad Fort Information in Marathi याबद्दल संपूर्ण माहिती लिहिली आहे.
प्रत्येक मराठी माणसानं एकदा तरी रायगड किल्ल्यावर जाऊन यायला पाहिजे.रायगड किल्ल्याची सगळ्या लोकांना माहिती असली पाहिजे त्यासाठी तुम्हांला ही Post उपयोगाला पडेल.कधी तुम्हांला रायगड किल्ल्यावर जावेसे वाटले तर तेथे तुम्हांला काय काय पाहायला मिळेल,तेथे कसं जायचं हे सर्व या Post मध्ये वाचायला मिळेल.
Raigad Fort Information in Marathi
रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड याठिकाणी एक डोंगरी किल्ला आहे. हा दख्खन पठारावरील अतिशय मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे.सह्याद्री पर्वत रांगांमध्ये महाड या रायगड जिल्ह्यातील ठिकाणापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर रायगड हा किल्ला बांधलेला आहे. रायगडावरील अनेक बांधकामे आणि संरचना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नेतृत्वाखाली बांधल्या होत्या . १६७४ मध्ये मराठा साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाल्यावर रायगडला राज्याची राजधानी बनविण्यात आली.
रायगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजेच २७०० फूट उंचीवर वसलेला आहे. हा गिरीदुर्ग प्रकारातला सुलभ आणि चढण्यास सोपा असा किल्ला आहे. या डोंगरी किल्ल्याचे बांधकाम छत्रपतींच्या निवडक व्यक्तीपैंकी हिरोजी इंदुलकर यांनी केले आहे. या बांधकामासाठी मुख्य महाल हा संपूर्णतः लाकडी बनविण्यात आला होता. आता मात्र कालाच्या ओघाने त्याचे फक्त आधारस्तंभ शिल्लक राहिले आहेत.
बांधकामानंतर, रायगड किल्ल्याने 2५ वर्षांहून अधिक काळ मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून काम केले. छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यात वास्तव्यास होते आणि त्यांचे सर्व प्रशासकीय आणि राजकीय कामकाज येथूनच चालत होते. हा किल्ला लष्करी तळ म्हणून देखील वापरला गेला आणि मराठा साम्राज्याने लढलेल्या अनेक लढायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
रायगड किल्ल्यावर चढण्याससाठी जवळ जवळ १४३५ पायऱ्या आहेत.आता रायगडावर रोपवे पण आहे हा रोपवे भारतातील ७५० मीटर-लांब आणि ४०० मीटर-उंच एरियल ट्रामवे आहे.गडाच्या पायथ्याशी रायगडवाडी व पाचाड ही गावे आहेत. रायगड किल्ल्यावर मराठा काळात या वस्त्या निर्णायक होत्या. गडाच्या शिखरावर चढण्याची सुरुवात थेट पाचाडमध्ये होते.
रायगड किल्ल्याचा पूर्वीचा इतिहास
इ.स. १०३० च्या काळात चंद्रराव मोरे यांनी रायगड किल्ला बांधला.रायगड हा पाचशे वर्षांपूर्वी फक्त एक टेकडीच्या स्वरूपात होता. त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे प्राचीन नाव ‘रायरी’ होते.तेव्हा रायगडला युरोपमधील लोक त्याला ‘इस्टर्न जिब्राल्टर’ म्हणत असत.रायगड जितका अजिंक्य आणि दुर्गम आहे तितकाच जिब्राल्टरचा ठाणेही अजिंक्य आहे.त्याचा आकार, उंची आणि आसपासच्या दऱ्या यामुळे याला ‘नंदादीप’ म्हणूनही ओळखले जायचे. रायगडचा किल्लाचा विस्तीर्ण असा आकार समुद्रसपाटीपासूनची चांगली उंची आणि आसपासच्या दऱ्याखोऱ्यांमुळे यास अजिंक्यत्व प्राप्त झाले होते.
मराठा साम्राजात येण्यापूवी॔ हा किल्ला निजामाकडे होता. निजाम याचा वापर प्रामुख्याने कैद्यांना ठेवण्यासाठी करत होता.त्या नंतर छत्रपती शिवजी महाराजांनी हा किल्ला रायरीचा वेढा या मोहिमेत 6 एप्रिल 1656 मध्ये जिंकून घेतला आणि त्या किल्ल्याची डागडुजी केली. या डागडुजीसाठी कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेला खजिना वापरण्यात आला. आणि अखेर डागडुजी पूर्णत्वास आल्यानंतर समुद्रापासून अगदी जवळ आणि दुर्गम भागात असणाऱ्या या किल्ल्याचे महत्त्व ओळखून शिवरायांनी रायगडास राजधानी करण्याचा निर्णय घेतला.
रायगड किल्ल्यावरील महत्त्वाचे पाच दरवाजे
महादरवाजा
महादरवाजा म्हणजे रायगड किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी जो पहिला दरवाजा लागतो तो दरवाजा.महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे.हा दरवाजा 3५० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि हत्तीच्या मदतीने शत्रू तोडू शकत नाही अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे.
पालखी दरवाजा
स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता आणि सर्व राण्यांच्या पालख्या या दरवाजातून जात असत, म्हणून या दरवाज्याला पालखी दरवाजा असे म्हणतात
वाघ दरवाजा
वाघ दरवाजा हा फक्त जरूरी वेळेला उघडत असत .या दरवाजातून गडावर प्रवेश करणे अशक्य आहे. कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते.या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो.जेव्हा रायगडावर झुल्फिरखानाचा वेढा पडला होता तेव्हा राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटून गेली होती.
नगारखाना दरवाजा
नगारखाना हा दरवाजा हा बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक आहे जो आपण सिंहासनासमोर पाहू शकता.सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर पोहचतो. राजाच्या दरबारी, रायगड किल्ल्याच्या आत मूळ सिंहासनाची प्रतिकृती आहे जी मुख्य दरवाजाच्या समोर आहे ज्याला नगरखाना दरवाजा म्हणतात.
मेना दरवाजा
जर तुम्हीं रोपवे मार्गाने गडावर गेलात, तर तेथून काही पायऱ्या चढल्यावर जो दरवाजा लागतो त्या दरवाज्याला मेना दरवाजा म्हणतात.जर तुम्ही या दरवाजातून सरळ गेलात तर तुम्हाला एक पालखी दरवाजा मिळेल. दोन्ही दरवाजे सरळ रेषेत आहेत.पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून आत गेल्यावर बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
नाना दरवाजा
या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असे म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
पाचाडचा जिजाबाईंचा वाडा
उतारवयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंना म्हणजेच जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक छानपैकी वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी त्यासाठी केली होती.वाड्यामध्ये पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
चोरदिंडी
महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून थोडे चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
हत्ती तलाव
महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो म्हणजे हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
गंगासागर तलाव
हत्तीतलावापासून पूढे जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो म्हणजे गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
स्तंभ
गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
जगदीश्वर मंदिर
बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो.
शिरकाई देऊळ
महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते म्हणजे शिरकाईचे मातेचे देऊळ. शिरकाई ही गडावरील प्रमुख देवता आहे .शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण करून देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर या गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाच्या माणसाने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा या नावाचा फलक होता.
खुबलधा बुरुज
जेव्हा तुम्ही गडावर चढायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला बुरुजाचे ठिकाण दिसते, हे प्रसिद्ध खुबलधा बुरुज आहे.बुरुजाच्या पुढे एक दरवाजा होता, ज्याला ‘चित्र दरवाजा’ म्हणतात, पण हा दरवाजा आता पूर्णपणे मोडून टाकण्यात आला आहे.
राजभवन
राणीवशाचा समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.
रत्नशाळा
राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
राजसभा
महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते.
बाजारपेठ
नगारखाना दरवाज्यातून डावीकडे उतरून गेले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. त्याच जागेवर आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये जे भव्य अवशेष दिसतात तीच जागा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगेत प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा अरूंद रस्ता आहे.ही बाजार पेठ आजही हुबेहुब जसेची तसीच आहे.
महाराजांची समाधी
जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाज्यापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौक आहे तो चौक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची समाधी. ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमानमहाराजधीराजा शिवाजी महाराज छत्रपती यांचे रायगड येथे शके १६०२ चैत्र (शुद्ध १५ इसवी सन १६८०) निधन झाले.देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याचा महाद्वाराचा बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. महाराजांच्या समाधीच्या पूर्व दिशेला भवानी टोक आहे आणि उजवीकडे धान्याचे कोठारे आणि बारा टाक्या आहेत.
कुशावर्त तलाव
डाव्या हाताचा होळी माळ सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे मंदिर दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतला नंदी आपल्याला दिसतो.
टकमक टोक
बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरले की टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका ठिकाणी दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे आपण जावे तसतसा रस्ता एकदम निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड वाहत असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते.आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जात असे.
हिरकणी टोक
गंगासागर तलावाच्या उजव्या बाजूकडे पश्चिम दिशेला जी चिंचोळी वाट जाते ती वाट हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाच्या संदर्भात एक धाडसी माता हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे तर उजव्या बाजूला आपल्याला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या आणि लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
वाघ्या कुत्र्याची समाधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार चालू असताना वाघ्या नावाच्या कुत्र्याने आगीमध्ये उडी टाकली त्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधी पण रायगड किल्ल्यावर आहे.
रायगड किल्ल्यावर कसे जावे
रेल्वे मार्गाने
रेल्वेने तुम्हांला रायगड किल्ल्यावर जायचे असल्यास माणगावची ट्रेन पकडावी लागेल. माणगाव रेल्वे स्थानकावरून तुम्हीं टॅक्सीने पाचाड या गावी जाऊ शकता नाहीतर तुम्हीं बसने पण जाऊ शकता. माणगाव बसस्थानकावरून पाचाडला जाण्यासाठी बसेस सहज मिळतील.माणगाव रेल्वे स्थानकापासून साधारण ५ ते १० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर तुम्हाला माणगाव बस स्थानक मिळेल. माणगाव बसस्थानकावरून तुम्हांला पाचाडला जाण्यासाठी बस सहज मिळेल ज्याची किंमत कॅब किंवा ऑटोच्या तुलनेत बरीच कमी आहे.
पाचाड हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले एक गाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही पाचाड येथून ट्रेक सुरु करू शकता किंवा रोपवेच्या मार्गाने पण जाऊ शकता. रोपवे हा किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्याचा जलद मार्ग आहे.
हवाई मार्गाने
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आणि पुणे विमानतळ हे रायगड किल्ल्या जवळील दोन विमानतळ आहेत.रायगड किल्ल्यापासून पुणे विमानतळ १४० किलोमीटर अंतरावर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई हे १७० किलोमीटर अंतरावर आहे.
रस्ता मार्गाने
रायगड किल्ल्यापासून माणगाव बसस्थानक जवळचे बसस्थानक आहे. पाचाड गावापासून माणगाव बसस्थानक २६ किमी अंतरावर आहे. रायगड किल्ल्याचा ट्रेक याच गावातून सुरू होतो. माणगाव बसस्टँडला पोहोचले की त्या ठिकाणाहून पाचाडला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. एमएसआरटीसीच्या बसेस माणगाव ते पाचाड नियमितपणे चालू असतात.आपलं स्वतःची गाडी असेल तर त्या गाडीने रायगड किल्ल्यावर जाणे पण सोयीस्कर ठरेल.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी Raigad Fort Information in Marathi या लेखात लिहिलेली माहिती तुम्हांला नीट समजली असेल असे मी समजतो आणि तुम्हीं पण हा लेख इतरांना शेयर करा ही नम्र विनंती.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
रायगड किल्ला चढायला किती वेळ लागतो?
रायगडावर किल्ल्यावर चढण्यासाठी १४३५ पायऱ्या चढून जावे लागते. यासाठी साधारण दोन तास सहज लागू शकतात.
रायगड किल्ला कोणी बांधला?
रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बांधून घेतला होता. या डोंगरी किल्ल्याचे बांधकाम छत्रपतींच्या निवडक व्यक्तीपैंकी हिरोजी इंदुलकर यांनी केले आहे. या बांधकामासाठी मुख्य महाल हा संपूर्णतः लाकडी बनविण्यात आला होता. आता मात्र कालाच्या ओघाने त्याचे फक्त आधारस्तंभ शिल्लक राहिले आहेत.
रायगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यात आहे .या ठिकाणापासून रायगड किल्ला सुमारे २५ किमी अंतरावर आहे.