Sane Guruji information in Marathi

Sane Guruji information in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपल्या भारतात अनेक महान लोक होऊन गेली आहेत.त्यांनी आपल्या विचारांनी आणि कार्याने भारतीय समाजात आमूलाग्र बदल घडवून आणले.त्यांचे कार्य खूप महान आहे.आज आपण अशाच एका महान व्यक्ती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ते महान व्यक्ती म्हणजे साने गुरुजी.Sane Guruji Information in Marathi या Post मध्ये आपण त्यांचा जन्म त्यांची जडणघडण, त्यांचे कार्य यांची सविस्तरपणे माहिती माहिती जाणून घेणार आहोत.

 

पांडुरंग सदाशिव साने हे एक मराठी लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र, भारत येथील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांना विद्यार्थी व अनुयायी “साने गुरुजी” म्हणून ओळखत असे.साने गुरुजी यांनी विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि कामगार यांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी लढे दिले आहेत.

 

Sane Guruji Information in Marathi 

Sane Guruji information in Marathi

साने गुरुजींचा जन्म आणि जडणघडण

साने गुरुजी यांचे मुळ घराणे देवरूखचे पण पुढे कालांतराने त्याचांतील काही लोक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड या गावी स्थायिक झाले.या पालगड गावीच श्री . सदाशिवराव उर्फ भाऊराव आणि सौ यशोदाबाई उर्फ बयो या दांपत्याच्या पोटी २४ डिसेंबर १८९९ रोजी साने गुरुजी यांचा जन्म झाला.त्यांचे नाव ठेवले होते पंढरीनाथ पण पुढे शाळेत नाव घालण्याच्या वेळी तो झाला पांडुरंग.पांडुरंग सदाशिव साने व नंतर पुढे महाराष्ट्राचे ते साने गुरुजी म्हणून प्रसिद्ध झाले.

 

घरात त्यांना सगळे पंढरी म्हणूनच हाक मारत.पंरतु त्यांना राम हे नाव खूप प्रिय होते पण पुढे दापोलीच्या शाळेत गेल्यावर त्यांना तेथे राम नावाचा मित्रच मिळाला.या दोघांची मैत्री छान जमली आणि ती शेवटपर्यंत कायम होती. यशवंत, पुरूषोत्तम, सदानंद आणि थोरली अक्का ही भावंडे त्यांना अण्णा म्हणायची.

 

श्यामच्या जीवनाला आकार देण्यात त्यांच्या आईचा हातभार मोठा होता.श्याम कसा घडला,कसा वाढला यांची सविस्तरपणे हकिकत ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजी यांनीच लिहिली आहे.’श्यामची आई’ या पुस्तकाच्या प्रारंभी श्यामने आपल्याला बालपणी आईकडून मिळालेले उंदड प्रेम आणि शुभ संस्कार जीवनभर कसे पुरले तीच त्यांची जीवनसत्त्वे कशी बनली यांच्या कथा गोष्टी आठवणीच्या रूपाने सांगितल्या आहेत.साने गुरुजी म्हणजेच श्यामचे आपल्या आईवर खूप प्रेम होते.साने गुरुजी यांना त्यांच्या भाग्याने थोर माता मिळाली.साने गुरुजी म्हणतात आई माझा गुरु,आई कल्पतरू | तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले . प्रेमळपणे बघायला, प्रेमळपणे बोलायला तिने मला शिकवले.मनुष्यावर नव्हे तर गाईगुरांवर ,फुलपाखरांवर ,झांडावर प्रेम करायला तिनेच मला शिकवले.अंत्यत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्तमप्रकारे करत राहणे तिनेच शिकवले.लहान लहान गोष्टींतून आणि छोट्या छोट्या प्रसंगातून श्यामच्या आईने आपल्या पंढरीला म्हणजेच साने गुरुजी यांना सर्वांभूती देव पाहण्याची आणि सर्वांवर प्रेम करण्याची मंगल शिकवण दिली.

 

मातृभक्त साने गुरुजी

साने गुरुजींचे आणि त्यांच्या आईचे म्हणजे यशोदाबाईंचे नाते विलक्षण होते. गुरुजी यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते.. मातृत्वाने गुरुजींचे ह्रदय एकसारखे ओंसडत होते, म्हणूनच त्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून बाहेर पडणारे प्रत्येक अक्षर न् अक्षर पावित्र्याने आणि मांगल्याने ओथंबून निघाले.

 

लहानपणापासूनच गुरुजी चे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते व त्यांच्यावर आईच्या शिकवणुकीचा मोठाच प्रभाव पडला होता. गुरुजींच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार घडविले त्यातूनच त्यांचा जीवनविकास झाला. सर्वांभूती प्रेम करण्याचा धडा त्यांना त्यांच्या आईनेच दिला. ‘श्यामची आई‘ या पुस्तकात गुरुजींनी आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत.

 

साने गुरुजी यांचे शिक्षण

कोकणातील पालगड गाव तसे लहान खेडेगाव होते.तेथे त्या काळात माध्यमिक शिक्षणाची काहीही सोय नव्हती.प्राथमिक शाळा तिथे पाचवीपर्यंतच होती.त्यामूळे पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर जाणे भागच होते.त्यामूळे त्यांनी आपले पुढील शिक्षण दापोलीच्या इंग्रजी शाळेत घेतले.श्याम दापोलीत आतेकडे शिकायला आला.१० जून १९१२ रोजी दापोलीच्या मिशन हायस्कूलमध्ये भाऊरावांनी त्यांचे नाव घातले.ही शाळा नामांकित होती या शाळेत महर्षी कर्वे आणि म. म.पां.वा.काणे या सारखे महान विद्यार्थी या शाळेत घडले.आत्याच्या घरच्या वातावरणाचा जसा अनुकूल प्रभाव पडला तसाच शाळेतील वातावरणाचा पडला.शाळेतील्या अभ्यासाबरोबरच त्याने शांकुतलाची प्रस्तावना ,काव्यदोहन,नवनीत ही पुस्तके वाचून काढली.पुढील शिक्षणासाठी मात्र त्यांना दापोली, औंध, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागले.पुण्यात आल्यावर श्यामने नुतन मराठी विद्यालयात ६वीच्या वर्गात नाव घातले.

 

सन १९१८ मध्ये पुण्याच्या याच नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.पुढील शिक्षणासाठी त्यांनी ‘न्यू पूना कॉलेज ‘ मध्ये प्रवेश घेतला.आजचे सर परशुराम कॉलेजम्हणजे त्या काळचे न्यू पूना कॉलेज होय. १९१८ ते १९२२ अशी चार वर्षे त्या महाविद्यालय साने गुरूजी (श्याम) यांनी घेतले.प्रो .घारपुरे,प्रो.द.वा.पोतदार ,प्रो.द.के.केळकर,प्रो .ना.सी.फडके आदि प्रसिद्ध लेखक, वक्ते,संशोधक आदि विद्वानांच्या सहवासाचा व त्यांच्या शिकवण्याचा लाभ साने गुरुजी यांना त्या काळात लाभला.अनेक अडचणी,संकटे यांच्याशी झुंजूंन त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले.१९२२ साली ते संस्कृत व मराठी विषयात बी.ए झाले.बी .ए झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी गेले.पुढे त्यांनी १९२४ मध्ये एम.ए केले.

 

साने गुरुजी यांची शैक्षणिक कारकीर्द 

तत्त्वज्ञान मंदिरात असतानाच त्यांचे वडिल वारले.तत्त्वज्ञान मंदिरात गुरुजींचे मन रमले नाही म्हणून १९२४ साली एम .ए झाल्यावर ते अंमळनेर येथील खानदेश एज्युकेशन सोसायटीमध्ये ते पी.एस .साने सर म्हणून रुजू झाले.तेच हायस्कूल आता प्रताप हायस्कूल म्हणून ओळखले जाते.शाळेत गुरुजी त्या वेळच्या पाचवीला इंग्रजी व संस्कृत, सहावीला मराठी आणि मॅट्रिकला इतिहास व मराठी हे विषय शिकवीत असत. जो विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा, त्या विषयाची मिळतील तेवढी पुस्तके मिळवून वाचीत असत आणि मग शिकवायला विद्यार्थ्यांपुढे उभे राहत असत. म्हणजे अध्यापनापूवी अध्ययन करणारे हे खरेखुरे निष्ठावंत गुरुजी होते. अशा निष्ठेमुळेच त्यांनी ‘गुरुजी’ हे नाव सार्थक केले.

 

साने सर उत्तम शिकवतात एवढी लोकप्रियता त्यांनी थोड्या दिवसात मिळवली. हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक श्री. गोखले यांनी गुरुजींच्या ठायीची विद्यार्थ्यांविषयीची‌ कळकळ व वात्सल्य ही श्रेष्ठ गुणसंपदा पाहिली आणि त्यांच्यावर तेथील वसतिगृहाची जबाबदारी सोपवली.अडलेल्याᅳनडलेल्यांना मदत करण्यासाठी ते सदैव पुढे येत असत. जवळचे देण्याचा अभ्यास त्यांनी लहानपणापासूनच केला होता. शाळेत काही विद्याथी अत्यंत गरीब असत. घरच्या दारिद्र्यामुळे शिक्षण अर्ध्यावरच सोडण्याची पाळी काही जणांवर येई. वैद्य नावाचा असाच एक विद्यार्थी होता. गरीब पण हुशार त्याच्यावर अशी वेळ आली होती त्यावेळी ते वैद्यकडे गेले आणि म्हणाले ”तुला वर्षंभर मी फी देईन पण तू शाळा सोडू नकोस.खरोखर ते महान गुरुजी होते.

 

छात्रालयात गरुजींनी काही अभिनव असे उपक्रमही सुरू केले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याचा त्यांना ध्यासच लागलेला होता. या ध्यासातूनच त्यांनी ‘छात्रालय दैनिक सुरू केले होते. त्या दैनिकात कितीतरी विविध विषयांवरचे लेख ते देत असत. धर्म, शिक्षण, इतिहास, संस्कृती, थोरांची चरित्रे, काव्य, कथा, असे अनेक प्रकारचे साहित्य असे. ते दैनिक मुलांना जणू विश्वदर्शन घडवीत असे. ‘खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाज्यापयंत आणून ठेवतो.’ गुरुजी आपल्या लेखणीने हेच कार्य करीत होते.शिक्षक आणि छात्रालयप्रमुख म्हणून गुरुजी विद्यार्थ्यांत रमून गेले होते.या कामाचा त्यांना हर्ष,आनंद ,सुख समाधान सर्व काही होते.छात्रालयातील त्यांच्या समपर्णामूळे त्यांना त्यांचे सहकारी ‘छात्रानंद गुरुजी’ असे म्हणत.

 

आशुतोष मुखर्जी,ईश्वरचंद विद्यासागर, इतिहासाचार्य राजवाडे,शिशिर कुमार घोष, रवींद्रनाथ टागोर अशी काही चरित्रेही गुरुजींनी त्या काळात लिहून प्रसिद्ध केली.या थोरांच्या चरित्र कार्यापासून प्रेरणा घेऊन तरूणांनी कार्यशील बनावे असा त्यांचा लेखनामागचा हेतु होता.हे एक राष्ट्रकार्य आहे असे त्यांना वाटे.ते म्हणत असत, “ I am not a teacher, I am a preacher.” शिक्षकाच्या पेक्षाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी पवित्र आणि उदात्त होती.

 

स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग

साने गुरुजी छात्रालयाच्या कामात खूप रंगून गेले होते, त्यामुळे त्यांना सर्वजण ‘छात्रानंद’ असेच म्हणत.असत.गुरुजी खरं तर सेवावृत्तीचे होते! आपल्या हातून काहीच घडत नाही याची‌ खंत मात्र त्यांना सदैव वाटत असे. त्यांच्या अंतःकरणात अशी एक रुखरूख होती, ‘आपल्या हातून काही घडत नाही. देशासाठी आपला देह कारणी लागत नाही, देशसेवा करण्याची संधी मिळत नाही.’ याची त्यांना तळमळ लागून राहिली होती. त्यांना वाटायचे आपण इथे या शाळेच्या कामातच बुडून जाणार का? बाहेर स्वातंत्र्याचा लढा चाललेला आहे, त्यात आपण नाही का उडी घेणार? आणि अशा अस्वस्थ मनःस्थितीत असतानाच १९३० साल उजाडले. ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्री लाहोर येथे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हेच आपले ध्येय आहे’ असे घोषित केले . देशात नवचैतन्य उसळले!

 

ही घोषणा ऐकून त्यांनी पण स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याचे ठरवले.गुरूजींनी मनावर ताबा ठेवून ते दिवस कसेबसे लोटले आणि मग २९ एप्रिल १९३० रोजी गुरुजींनी शाळेचा निरोप घेतला आणि गुरुजी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले.

 

गुरुजी गावोगावी स्वातंत्र्याचा संदेश देत गुरुजी फिरले.नंतर ते कोकणात शिरोड्यालाही गेले.शिरोडा येथे मोठी सत्याग्रह छावणी उघडलेली होती.महाराष्टातून शेकडो मिठाच्या सत्याग्रहासाठी शिरोड्यात जमा झाले होते.गुरूजींना परत तेथे खानदेशात जाऊन निधी गोळा करण्याचा आदेश‌  मिळाला.गुरूजी परत खानदेशात आले आणि गावोगावी हिंडून सभा घेऊ लागले.निधी जमा करू लागले.साने गुरुजी गावोगावी फिरून लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत करत होते.त्यांच्या प्रचाराने सरकारी अधिकारी खवळले.त्यांनी गुरुजींना पकडून तुरुंगात डांबूण्याचे ठरवले.एके दिवशी संध्याकाळी अंमळनेरला सभा होती. नदीच्या वाळवंटात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.सभेच्या आधी अटक होऊ नये म्हणून गुरुजी टांग्यात बसून आले होते.सभेत गुरुजी उभे राहिले.त्या दिवशी गुरुजींची वाणी साम्राज्यशाहीवर अग्निवर्षाव करीतच राहिली.विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची कळकळीची विनंती गुरुजींनी केली.सभा संपताच गुरुजींना फौजदाराने अटक केली.खटला भरण्यात आला.गुरुजींना १५ महिने सक्तमजुरी आणि २०० रू दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली.गुरूजींना धुळे तुरुंगात पाठवण्यात आले.१७ मे १९३० रोजी गुरुजींचा पहिला कारावास सुरू झाला.

 

सन १९३८ च्या मोठ्या दुष्काळात खानदेशातील शेतकऱ्यांची पिके पुरती बुडाली होती. या कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांचा सारा माफ करावा, या मागणीसाठी साने गुरुजींनी जळगावला शेतकऱ्यांची एक परिषद आयोजित केली. १९३८ मध्ये साने गुरुजी यांनी ‘काँग्रेस’ या नावाचे एक साप्ताहिकही सुरू केले.साने गुरुजींनी 1930 ते 1947 दरम्यान अनेक आंदोलनात भाग घेतला आणि त्यांना आठ वेळा ताब्यात घेण्यात आले. धुळे, त्रिचीनपल्ली, नाशिक, येरवडा, जळगाव अशा विविध ठिकाणी त्यांनी एकूण सहा वर्षे सात महिने कारावास भोगला.

 

तुरुंगात असताना साने गुरुजींनी बंगाली आणि तमिळ भाषा आत्मसात केल्या. तुरुंगात असताना त्यांनी त्यांची बहुतेक पुस्तके लिहिली . नाशिकमध्ये तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई या सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले आणि ते अजरामर केले.

 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्रात, ग्रामीण भागात विशेषतः खान्देशात उपस्थित होती. काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात त्यांनी आघाडीची भूमिका घेतली.1936 मध्ये जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि 15 महिने तुरुंगात काढले.फैजपूर अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधींच्या शिकवणीनुसार “मेल वहाणे” आणि इतर ग्रामीण स्वच्छतेची कामे केली. त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.

 

सत्य आणि प्रेम

साने गुरुजींनी नेहमी सत्य आणि प्रेमाच्या दिशेवर भर दिला. त्यांच्या लेखनातून या मूल्यांवरील त्यांची गाढ श्रद्धा आणि ते एक सुसंवादी समाजाचे आधारस्तंभ असल्याची त्यांची खात्री दिसून आली. त्यांनी सहमानव आणि राष्ट्र, संस्कृती आणि निसर्ग यांच्यावर प्रेमाचा पुरस्कार केला.

 

निःस्वार्थ सेवा 

साने गुरुजींचा देश आणि मानवतेच्या नि:स्वार्थ सेवेवर ठाम विश्वास होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा सहभाग आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न या अतुलनीय असे होते.

 

साने गुरुजी यांनी लिहिलीली पुस्तके

श्यामची आई

सुंदर कथा

मूलासाठी फूले

सोनसाखळी

खरा मित्र

श्यामची पत्रे

कर

करूणादेवी

रामाचा शेला

जयंता

नवा प्रयोग

दुःखी

कावळे

अमोल गोष्टी

भारतीय संस्कृती

इस्लामी संस्कृती

चिनी संस्कृती

कला आणि इतर निबंध

कला म्हणजे काय?

कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य

‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर

क्रांति

गीताहृदय

गुरुजींच्या गोष्टी

गोड गोष्टी (कथामाला), भाग १ से १०

 

साने गुरुजींनी प्रसिध्द अशा काही कविता

||खरा तो एकची धर्म||

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..

जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित |

तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे|

 

|| बलसागर भारत होवो||

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो..

हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिधले |

राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया होवो…

विश्वात शोभुनी राहो….

 

साने गुरुजींचा मृत्यू

१९५० च्या मे च्या अखेरीस गुरुजी कर्नाटकात धारवाड, हुबळी,गदग इत्यादी ठिकाणी गेले होते.तिथे त्यांची गीतेवर प्रवचने झाली.आंतरभारतीच्या दृष्टीने शेजारच्या प्रांताची ओळख झाली.कन्नड वाड्मयासंबधी बरीच माहिती मिळाली.

 

लोकजीवनाचे जवळून दर्शन घडले.कर्नाटकचा दौरा संपवून २ जून रोजी गुरुजी मुंबईला परतले आणि पुढच्याच आठवड्यात मनीध्यानी नसताना गुरुजींनी आपली जीवनज्योत मालवून या जगाचा निरोप घेतल्याची अंत्यंत कटू बातमी साऱ्या महाराष्ट्राला आणि भारताला ऐकायला मिळाली.११ जून १९५० चा तो दिवस होता.अवघ्या महाराष्ट्राला गुरूजींच्या निधनवाते॔ने धक्का बसला.

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

साने गुरुजी यांनी एकूण किती पुस्तके लिहिली आहेत?

साने गुरुजी यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. गुरुजींनी त्यांचे बहुतांश असे लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली.

 

साने गुरुजी यांचा जन्म कोणत्या वर्षी व कोणत्या गावात झाला?                     ‌

साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाला.

 

साने गुरुजींच्या आईचे नाव काय होते?

साने गुरूजींच्या आईचे नाव यशोदाबाई होते.साने गुरुजींनी आपल्या आईच्या आठवणीने श्यामची आई हे सुंदर असे पुस्तक लिहिले.

 

मित्रांनो जर तुम्हांला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडत असेल तर तुम्हीं तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की सांगा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती होईल. जर तुम्हांला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करून सांगू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts